संगमेश्वर / प्रतिनिधी :- डी.बी.जे.महाविद्यालय चिपळूण येथे संकल्पना ३:० विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित आव्हान,चिपळूण यांच्यामार्फत विज्ञान प्रश्नमंजुषा ,विज्ञान प्रदर्शन ,पूल बांधणी ,रोबो शर्यत व रोबोटिक्स बांधकाम स्पर्धा अशा स्पर्धांचे नुकतेच आयोजन केले होते.
या स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण ही शाळा सहभागी झाली होती. सदर स्पर्धेत एकूण ३४ विद्यार्थी सहभागी झाले होते. युनायटेडचाच एक भाग असलेल्या गुरुकुल विभागातील १३ विद्यार्थी तर युनायटेड मधून २१ विद्यार्थी यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत रोबोटिक्स (इयत्ता चौथी ते सहावी) या गटातून गुरुकुल विभागातील कु.वंश गडमे व कु.उदय पवार इयत्ता पाचवी यांचा तृतीय क्रमांक आला तर इयत्ता सातवी व आठवी या गटातून कु.रुद्र दाते व कु.नरेन धंदले या गुरुकुलच्याच विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आला.
विज्ञान प्रतिकृती (गट अ) या स्पर्धेत नील सावर्डेकर व योगेश्वर जरळी इयत्ता सातवी युनायटेड यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला तर प्रश्नमंजुषा ( गट अ) या स्पर्धेत सार्थक पिठले व आराध्य कुंभार इयत्ता पाचवी युनायटेड यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचे प्रशालेमार्फत आणि गुरुकुल विभागामार्फत अभिनंदन करण्यात आले.
परंपरा आणि संस्कृती जपत अध्ययन अध्यापन होणाऱ्या गुरुकुल विभागातील मुलांनी रोबोटिक्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धेत मिळवलेले विशेष कौतुकास्पद आहे.