देवरूख : देवरूख आगारातून पुणे स्वारगेटपर्यंत जाणारी आरामदायी गाडी दि.८ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
देवरूख-स्वारगेट ही गाडी दुपारी १२.४५ वाजता सुटणार असून स्वारगेट ते देवरूख ही गाडी रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. देवरूख, साखरपा, मलकापूर, कोकरूड, कराड, सातारामार्गे एस्टी गाडी स्वारगेटला पोहोचणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी देवरूख आगारामार्फत स्वारगेट मार्गावर नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे.
टू बाय टू आरामदायी साध्या दरातील गाडी सोडण्याचा निर्णय देवरूख आगारामार्फत घेण्यात आला आहे. रात्री उशिराची वेळ असल्यामुळे नोकरदार घरी येऊन जेवण आटोपून प्रवास करू शकतात. कराड, कोकरूड, मलकापूर मार्गामुळे प्रवासाचा वेळ, खर्च कमी होणार आहे. पुणे-देवरूख ही नियमित स्लीपर गाडी कायमस्वरूपी फुल असून एक गाडी नव्याने उपलब्ध करून दिल्यामुळे असंख्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभघ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.