ठेकेदाराचे ७ लाख रूपये ग्रा.पं.कडून थकित
तीनपैकी दोन बस सडताहेत
चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीची स्कूल बस मार्गताम्हाने येथील पद्मावती विद्यामंदिरच्या संकुल मैदानात गेली ३ वर्षे धूळखात पडलेली दिसून येत आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता अंजनवेल ग्रामपंचायतीने स्कूल बसेस बंद केल्या असून त्यांच्याकडून भाड्यापोटी ७ लाख रुपये येणे असल्याचे माहिती दिली. अंजनवेल येथे स्व. अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बस सुरू करण्यात आल्या. हा खर्च ग्रामनिधीतून भागवला जात होता. कालांतराने ग्रामनिधीकडे पैसाच शिल्लक नसल्याने व आरजीपीपीएल कंपनीकडून कर येणेही बंद झाल्याने या शाळेचे भवितव्य अंधारमय झाले आहे. जो कोट्यवधीचा निधी होता तो आंतरराष्ट्रीय शाळेवर खर्च करण्यात आला. त्यामुळे शाळेच्या बसचे भाडे देणे ग्रामपंचायतीला परवडत नसल्याचे पुढे करण्यात आले.
अंजनवेल ग्रामपंचायतीने शाळेच्या मुलांना ने-आण करण्यासाठी एकूण ३ बस खरेदी केल्या होत्या. मात्र ३ वर्षापूर्वी बसचे भाडे देण्यासाठी निधीच नसल्याने यापैकी २ बस धूळखात पडल्या आहेत. यातील एक बस अंजनवेल येथे तर दुसरी बस मार्गताम्हाने येथील शैक्षणिक संकुलाच्या मैदानात एका बाजूला खितपत पडल्याचे दिसून येत आहे. ही बस पूर्णतः सडत आली असून या बसला वाली कोण असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत बसचा ठेका घेणारे मार्गताम्हाने येथील अजित साळवी यांना विचारणा केली असता त्यांनी भाड्यापोटी ७ लाख रुपये ग्रामपंचायतीकडून थकित असल्याची स्पष्टोक्ती दिली.