देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथील स्पंदन धामणे याने राज्यस्तरावरील बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात पाचवा क्रमांक पटकावला. कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग करणे शक्य होईल, तसेच एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील. पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय ठरणारे ‘घूमर द स्पिन अँड जर्क लाँचर’ हे विज्ञान मॉडेल स्पंदनने या प्रदर्शनात मांडले होते. स्पंदन सध्या खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत असून त्याने या शाळेचे नेतृत्व केले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, विभागीय शिक्षण उसंचालक – अमरावती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षण विभाग यांच्यावतीने हे प्रदर्शन झाले. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था-अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय येथे हे ५२ वे राज्यस्तरीय बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन झाले.
स्पंदन याच्या घूमर द स्पिन अँड जर्क लाँचर या विज्ञान प्रकल्पाने खेड तालुकास्तरावर व रत्नागिरी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. यासाठी त्याला शाळेची विद्यार्थिनी सई कदम हिची साथ मिळाली होती. कमी इंधनात, कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग करणे शक्य होईल, असे या प्रकल्पातून स्पंदनने सिद्ध केले आहे. तसेच एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील.
पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय होऊ शकतो. अवकाश संशोधनातील हे विज्ञान मॉडेल तयार करण्यासाठी स्पंदनची आई शर्वरी धामणे, विश्वजित मोहिते, प्रसाद सावंत, तनुजा चव्हाण, रोहित सर, रिया पवार आणि सर्व विज्ञान विभाग शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रकल्पाची निर्मिती करताना स्पंदनचे वडील डॉ. गौरव धामणे, मीना कोळपे, वैभव बुर्शे, सन्मुख कोळेकर, शशांक धामणे, प्रसाद कांगणे यांचे सहकार्य लाभले.
रोटरी प्रतिष्ठान खेडचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळा पर्यवेक्षक शैलेश देवळेकर, राहुल गाडबैल, तेजश्री कानडे, पृथा वडके यांनी स्पंदन आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
स्पंदन धामणे याने यापूर्वी विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.