पोफळी – चिपळूण तालुक्यातील पोफळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना हौरण करणाऱ्या उपद्रवी माकडांना पकडून वन विभागाने वन विभागाच्या राखीव जंगलात सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधानाचा निःश्वास टाकत वन विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
येथील शेतक-यांचे या माकडांपासून होणारे शेतीचे नुकसान वाचवावे, त्यांच्या त्रासापासून सुटका मिळावी यासाठी पोफळी ग्रामपंचायतीने वनविभागाला निवेदन दिले होते. काळ्या तोंडाचे वानर व लाल तोंडाचे माकडे यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसह वाड्या वस्ती व महानिर्मिती कॉलनीमधील रहिवाशी त्रासले होते. याची दखल घेऊन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कार्यवाही करत या माकडांना पकडून विभागातील राखीव जंगलात सोडण्यात आले. या कारवाईमुळे शेतीचे व आंबा पिकांचे होणारे नुकसान टळले असल्याने पोफळी गावातील ग्रामस्थांकडून तसेच शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करणेत येत आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही मोहिम राबवण्यात आली. माकडे पकडण्यासाठी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक अधिकारी प्रियंका लगड, वन क्षेत्र अधिकारी खान, वनपाल सावंत, राहुल गुंठे, कृष्णा रमले व संभाजीनगर वरून माकडे पकडण्यासाठी आलेले समाधान, सोमनाथ, गिरी पोफळी ग्रामपंचायत सरपंच उस्मानभाई सय्यद, ग्रामपंचायत सदस्य संजय बामणे, ग्रामपंचायत कर्मचारी मनोज कांगणे, सय्यद, कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.