राजापूर:-मी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खासदार म्हणून राहिलो. जिवनामध्ये मी काही मिळवले माहिती नाही, परंतु मला खरी ओळख जर मिळवून दिली असेल तर ती रत्नागिरी जिल्ह्याने मिळवून दिलेली आहे.
हे मी कधीही विसरू शकणार नाही अशी भावना माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी तालुक्यातील कोंडये येथे बोलताना व्यक्त केली.
माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आमदार निलेश राणे शनिवारी सायंकाळी कोंडये येथे आले होते. यावेळी त्यांनी श्री गणेश सेवा मंडळ कोंडये आयोजित माघी गणेश जयंती उत्सवात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी निलेश राणे यांनी पुढे बोलताना आपण सर्वजण महायुतीचे आहोत. हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलो आहोत. सर्वांनी एकत्र मिळून गावाचा विकास केला पाहिजे. मी खासदार असताना या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली काही शिल्ल्क राहिली. मात्र आता योग्य हातात हा मतदार संघ आलेला आहे. आमदार किरण सामंत हे कामांचे योग्य नियोजन करून या मतदार संघाला शंभर टक्के न्याय देतील. मागील पंधरा वर्षात जो विकास झाला नाही तो आपणाला येत्या दोन वर्षात पाहायला मिळेल असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला.
मागील दोन वर्षापासून आपण बोलवत होता. मात्र नियतीच्या मनात मी आमदार झाल्यावर यावे असे असावे त्यामुळे मी आज आलो. आपण आपुलकीने बोलवलात, जिव्हाळयाने बोलविलात. त्याबद्दल कोंडये ग्रामस्थाना धन्यवाद दिले. तर रविंद्र नागरेकर, दिपक बेंद्रे यांचाही आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख केला. ही दोन्ही माणसे आमच्या घरची आहेत असे आम्ही समजतो असे ते म्हणाले तर अरविंद लांजेकर यांची समाजाप्रती असलेली धडपड याविषयीही श्री. राणे यांनी मिश्कील शब्दात कौतुक केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, दिपक बेंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर सुतार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अरविंद लांजेकर, शहर अध्यक्ष विवेक गुरव, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, प्रा. मारूती कांबळे, वसंत पाटील, रवि हर्याण, नागेश शेटये, संतोष धुरत, श्री गणेश सेवा मंडळ कोंडये मुंबई अध्यक्ष संजय शिवगण, जयराम शिवगण, गावकर शांताराम शिवगण, संतोष् शिवगण, प्रकाश शिवगण, मधुकर शिवगण, महेश बाईत, दिलिप बाईत, प्रविण आयनारकर, रविंद्र शिवगण आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांचा श्री गणेश सेवा मंडळ कोंडयेच्या वतीने मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय शिवगण व ग्रामिण मंडळाचे अध्यक्ष जयराम शिवगण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार
यावेळी माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे झालेल्या गर्जना सभेत घेतलेल्या गो संरक्षणाच्या भूमिकेबाबत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर व विवेक गुरव यांनी आमदार निलेश राणे यांना शाल श्रीफळ देवून सत्कार केला. तर निलेश राणे घेत असलेल्या गो रक्षण आणि हिंदुत्वाच्या भूमिकेला हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा पाठींबा जाहीर केला.