रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे, येणार्या पावसापूर्वी बहुतांशी काम करणार असल्याचे ठेकेदाराने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सांगितल्याची माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. गेली अनेक वर्ष हा महामार्ग रखडला असून तो लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.
मंत्री संजय शिरसाठ यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत, असे सांगत नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत याच्यावर सुद्धा तोफ डागली. संजय राऊतला चांगलं दिसत नाही. तो ज्या बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणार्या असतात असेही खा. नारायण राणे म्हणाले.
उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते, आता ते पुन्हा कामाला लागले आहेत. संजय राऊतना चांगलं दिसत नसल्याने तो असे शब्द वापरतो, त्यामुळे त्याला एके दिवशी चांगलं बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.