संगमेश्वर:-कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळ कोळंबे संचलित गुरुकुल मुलांच्या वसतिगृहाला शनिवार दि. ०१ फेबुवारी २०२५ रोजी सन २००८ -२००९ या वर्षातील इ. दहावीच्या बॅचच्या सर्वश्री प्रथमेश चव्हाण, सुरेश भोजे, मनिष पवार, ऋषिकेश साळवी आणि बासित बोट या माजी विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट दिली. गुरुकुल वसतिगृहामध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला वसतिगृहाचे अधिक्षक श्री. जुवेकर सर, कोळंबे हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक श्री. चव्हाण सर, वसतिगृहाचे चौकीदार श्री. विराज सालीम तसेच वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसतिगृहाचे अधिक्षक श्री. जुवेकर सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात वसतिगृहातील आठवणींना उजाळा दिला. वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेतल्याने इथून बाहेर गेल्यानंतर समाजात वावरताना आलेल्या अडचणींवर कशाप्रकारे मात करु शकलो याविषयी आपले अनुभव सांगितले तसेच वसतिगृह व शाळा यातून मिळालेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपले मार्गदर्शनपर विचार मांडताना वसतिगृहाचे अधिक्षक श्री. जुवेकर सर यांनी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी वसतिगृहाला भेट देण्यासाठी आले याबद्दल आनंद व्यक्त केला. आपण ज्या वसतिगृहामध्ये व शाळेमध्ये शिक्षण घेतले त्याची आठवण म्हणून आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण शाळा व वसतिगृहाला आवर्जून भेट दिली पाहिजे. त्यामुळे आपल्या आठवर्णीना उजाळा तर मिळतोच; परंतु आपला विद्यार्थी पुन्हा भेटल्याचा जो मनस्वी आनंद आम्हाला होतो, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. आपण वसतिगृहाला भेट द्यायला आल्यावर वसतिगृहाला काही दिले पाहिजे याची अपेक्षा नाही. आपले येणे हे आमचा उत्साह वाढवणारे तसेच अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करणारे असते.
कोळंबे हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक श्री. चव्हाण सर यांनी आपले विचार व्यक्त करताना माजी विद्यार्थी भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनः पुर्वक शुभेच्छा दिल्या. वसतिगृहात आज शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या मुलांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे आपली भविष्यातील वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
वसतिगृहाला भेट देण्यासाठी आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला ५ सिलिंग फॅन तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. वसतिगृहाचे चौकीदार श्री. विराज सालीम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.