राजापूर:-महाराष्ट्राचा इतिहास हा पराक्रमाचा, बुध्दिवैभवाचा आणि सेवाभावाचा असून तशा खुणाच समाजसेवी महाराष्ट्रात दिसून येतात. महाराष्ट्राचा हा इतिहास यापुढे जिवंत ठेवण्याचे काम बुद्धिजीवी वर्गाने, साहित्यिक, कलावंतांनी विचारवंतांनी करण्यास हवे. तरच अशा तऱ्हेच्या साहित्यिक, सांस्कृतिक मेळाव्यांना अर्थ उरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांनी वाटूळ येथील साहित्य संमेलनामध्ये केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि वाटूळ ग्रामस्थांच्यावतीने वाटूळ येथे आयोजित 10 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी वाटूळ येथे वै.ह.भ.प. हरिभाऊ रामचंद्र चव्हाण साहित्यनगरीत उद्योजक मधुकर गोमणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून गांगल बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी माणसाची जीवन जगण्याची उर्मी व उर्जा जिवंत ठेवण्याचे काम अशी सभा संमेलने करत असतात. ग्रामीण भागात अशा पध्दतीचे संमेलन भरवून लांजा राजापूर नागरी संघ साहित्य चळवळ जोपासण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी व्यासपीठावर माजी संमेलनाध्यक्ष ऍड. विलास कुवळेकर, भारताचार्य सु. ग. शेवडे, लेखक धीरज वाटेकर, संघ अध्यक्ष सुभाष लाड, चित्रकार विजयराज बोधनकर, सुहास आयरे, स्वागताध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, संमेलन समिती अध्यक्ष सुहास चव्हाण, विजय हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यानंतर वाटूळ सरपंच निता चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमेचे पूजन करून मधुकर गोमणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक मधुकर गोमणे यांनी ग्रामीण भागात साहित्य संस्कृती जतन करण्याचे काम राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ करीत असून त्याचे काम हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आयोजित पुस्तक प्रदर्शन, शस्त्र संग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यप्रेमी नागरिक व वाटूळ ग्रामस्थ उपस्थित होते.