चिपळुणात मराठा क्रांती प्रतिष्ठानची मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा
चिपळूण:-येथील वेसमारूती मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाठीमागील भिंतीवर ‘श्रीमंत’ हा शब्द लिहिण्यात आला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच ही पदवी इतरांना दिली, त्यांनाच ही पदवी आपण कशी देऊ शकतो? त्यामुळे हा शब्द काढून टाकावा, अशी मागणी मराठा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली. यावर लवकरच निर्णय घेऊ, असे भोसले यांनी सांगितले.
मराठा क्रांती प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेने नगर परिषदेचे मुख्याधिकारी भोसले यांची भेट घेत सविस्तर निवेदन देत चर्चा केली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासंदर्भातील काही गोष्टींबाबत पूर्तता करण्याची मागणी केली. पुतळयामागील भिंतीवरील महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित क्षणचित्रांचे काम अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. तसेच तात्पुरते लावलेले कागद आता निघण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले की, या कामाला जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी काही अवधी मागून घेतला आहे. परंतु हे काम करण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. आपले यावर लक्ष असून ते लवकरात-लवकर करून घेऊ.
यावेळी मराठा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव राजेश कदम, तसेच कार्यकारिणी सदस्य प्रदीप साळुंखे, विक्रम सावंत, रमेश शिंदे, दीपक जाधव, सुनील चव्हाण, प्रमोद कदम, अजय चव्हाण, अमित कदम, निर्मला जाधव, भाग्यश्री चोरगे उपस्थित होत्या.