रत्नागिरी : माघी गणेशोत्सवानिमित्त तालुक्यातील गणेशगुळे येथील श्रींच्या मंदिरात सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे (भडे) बुवा अशोक सुर्वे यांनी अतिशय सुस्वर आवाजातील भजने सादर केली. भजन रंगले आणि भाविकही या भजनात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सुर्वे बुवा हे रत्नागिरी एसटी आगारातील निवृत्त वाहक. नोकरीत असताना व आता निवृत्त झाल्यानंतरही ते भजनी वारसा वंशपरंपरेपासून आजतायगायत जोपासत आहेत. गेली ४० वर्षे बुवा सुर्वे ही भजनकला सादर करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणांहून चांगला प्रतिसादही मिळतोय. १९८५ पासून बुवा सुर्वे गायन कला शिकले व सुरवातीला भजने आणि १९९० पासून त्यांनी डबलबारी भजनी क्षेत्रात सेवा सुरू केली. आजपर्यंत भजनी वारसा चालवत आहेत. अनेक पारंपरिक डबलबारी केल्या आहेत. नैना म्युझिक कंपनीने २००४ च्या सुमारास डबलबारी भजनाची ध्वनीफितही काढली आहे. गणेशगुळे येथे श्रींच्या मंदिरात भजन केल्याबद्दल श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर व सर्व पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.