राजापूर : शहरानजीकच्या शीळ येथील डोंगरावर (सडा) वणवा लागून गेले दोन दिवस वणव्यामध्ये होरपळत होता. निकराच्या प्रयत्नामुळे वणवा विझविण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी, वणव्यामध्ये गुरांच्या वैरणाच्या गवतासह डोंगर भागामध्ये शेतकर्यांनी विकसित केलेल्या आंबा, काजूच्या बागांना वणव्याची झळ पोहचून त्यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
या वणव्यामध्ये ऐन हंगामामध्ये काजू बागायतदारांचे नुकसान होताना काजू बिया लगडलेली तिनशेहुन अधिक काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचवेळी, वणव्यामध्ये गवत जळून खाक झाल्याने गुरांच्या वैरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षामध्ये दिवाळीनंतर नोव्हेबर-डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर पुढे काही महिने या भागामध्ये सातत्याने वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये शेतकर्यांना विकसित केलेल्या बागा, गवत जळून खाक होताना लाखो रूपयांचा नुकसान होते. त्यामुळे सातत्याने वणवा लागण्याच्या घडणार्या घटनेबाबत शेतकर्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरानजीकच्या शीळच्या डोंगरावर (सड्यावर) वणवा लागल्याची घटना घडली. त्यामध्ये डोंगर परिसर वणव्याच्या आगीच्या ज्वालांनी दोन दिवस होरपळून गेला. सोसाट्याचा वारा आणि त्याला सुकलेले गवत याची साथ मिळून वेगाने पसरलेल्या वणव्याची झळ शीळ गावासह लगतच्या गोठणेदोनिवडे भागालाही काहीप्रमाणात बसली आहे. त्यामध्ये त्या भागातील गवत आणि जंगल परिसर जळून खाक झाला आहे. ही आग वा वणवा नेमका कोणी लावला वा कसा लागला याबाबत ठोस माहिती नसली तरी, लागलेल्या वणव्यामध्ये काही शेतकर्यांच्या बागा जळून खाक झाल्या आहेत. सड्यावर गुरांना चारण्यासाठी असलेले गवतही जळून खाक झाले आहे.
वणव्यामध्ये डोंगर होरपळत असताना काल दुपारी शीळ येथील मोठ्यासंख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी सुमारे तीन-साडेतीस तास निकराचे प्रयत्न करून वणवा विझविला. मात्र, त्यामध्ये तीनशेहून अधिक काजूची झाडे जळून शेतकरी, बागायतदार यांचे नुकसान झाले आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू असून या झाडांवर मोठ्याप्रमाणात काजूच्या बिया लगडलेल्या होत्या. मात्र, ऐन हंगामामध्ये वणव्यामुळे बसलेल्या नुकसानीया तडाख्यामुळे बागायतदार पुरते हतबल झाले आहेत. बागांमधील काजूची झाडे जळताना त्याच्या सोबत सड्यावर असलेले गवतही जळून भस्मसात झाल्याने शेतकर्यांच्या गुरांच्या वैरणाचा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होणार आहे.