घरात एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाचे गैरकृत्य
गुहागर : जिल्ह्यात विनयभंग, बलात्काराच्या वाढत्या घटनेची दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, चिमुकल्या मुली आज सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडत आहेत. बापासमान असणाऱ्या व्यक्तींकडून अशी घृणास्पद कृत्ये घडत आहेत. नुकतीच अशाप्रकारची घटना गुहागर मध्ये घडली आहे. एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा चक्क उपसरपंचाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा उपसरपंच 65 वर्षांचा आहे. घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधत त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. अशोक भुवड (६५, ता. गुहागर) असे या नराधम उपसरपंचाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिच्या घरचे बाहेर गेले होते. घरात इतर कोणी नसल्याची संधी साधत अशोक हा घरात शिरला. त्याने या मुलीचा विनयभंग केला. या प्रकाराने मुलगी घाबरली. तिने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. या प्रकाराने घरचेही घाबरले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी उपसरपंच अशोक भुवड यांच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार पोकसोअंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आता मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.