चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील रहिवासी असलेल्या प्रौढाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजता उघडकीस आली. प्रफुल्ल दिगंबर भोजने (५५, सध्या रा. बहादूरशेख नाका, चिपळूण, मूळ रा. विघ्नहर्ता सोसायटी, सी. विंग करी रोड मंबई- १२) असे त्यांचे नाव आहे.
दुय्यम निरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रफुल्ल भोजने बहादुरशेख नाका येथील आपल्या घरात बेशुद्ध पडले होते. काही लोकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. याबाबत पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
भोजने यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ही माहिती वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.