लाड यांची बंडखोरी; प्रदेशाध्यक्षांना अहवाल
रत्नागिरी : काँग्रेसच्या रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखत प्रक्रिया झाली. पाचजण जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. निरीक्षक अजिंक्य देसाई यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सामोरे गेल्यानंतर लाड यांनी राजापुरात चांगली मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाकडून संधी मिळेल, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी आग्रही धरला गटातटांमुळे २० वर्षांमध्ये काँग्रेस रसातळाला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेला. विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. यामुळे नाराज अविनाश लाड यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीबद्धल कॉग्रेस पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले आहे.
रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी निरीक्षक अजिंक्य देसाई रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांनी इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये हरिश शेखासन, सहदेव बेटकर, दीपक राऊत, अशोक जाधव, कॅ. हनिफ खलपे यांचा समावेश आहे.