रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची नवीन इमारत बांधकामे निकषात बसत नसल्याने रद्द करण्यात आली आहेत. ही कामे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून घेण्यात आली हाेती.
इमारतींची बांधकामे रद्द झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती माताेश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आखली होती. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती नादुरुस्त झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारती नव्याने बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ४४ ग्रामपंचायतींची कार्यालये चकाचक करण्यासाठी नवीन इमारतींच्या कामांना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून मंजुरी दिली होती.
मात्र, त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींच्या इमारतींची कामे निकषात बसत नसल्याने ती रद्द करण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याने त्यांची कामे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंजूर झालेल्या कामांपैकी २ ग्रामपंचायतींची कामे सुरू आहेत. तर कर्ला आणि मजगाव ग्रामपंचायतींच्या बांधकामांना जागेची अडचण निर्माण झाल्याने या इमारतींची कामे रखडली आहेत.
किती अनुदान मिळणार?
एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या – १२ लाख
१ ते २ हजार लोकसंख्या – १८ लाख ते २० लाख
२ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या – १८ लाख ते २५ लाख
स्वनिधीची अट रद्द
याआधीच्या योजनेत ग्रामपंचायतींना १५ आणि २० टक्के स्वनिधीची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींकडे इमारतच नाही त्यांना स्वनिधीसाठीही धडपड करावी लागत होती. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.
कामे रद्द झालेल्या ग्रामपंचायती
तालुका – रद्द झालेली कामे
मंडणगड १
खेड २
चिपळूण ६
संगमेश्वर ८
रत्नागिरी ५
लांजा ६
राजापूर ५
७ ग्रामपंचायतींची कामे पूर्ण झाली आहेत.