लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील कुवे खत कारखाना समोर आयशर कंटेनर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटासायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आरगाव कुणनेगाव येथील शिवाजी रामा भेरे (वय ५४) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र.(एमएच.०८.एएम.२६७६) ने लांजा येथे येत होते. शिवाजी भेरे यांची आरगाव कुणनेगाव येथे पिठाची गिरण आहे. या पिठाच्या गिरणीचे सामान आणण्यासाठी ते रत्नागिरी येथे चालले होते.
लांजा येथे मोटारसायकल ठेऊन ते एस.टी बसने रत्नागिरी येथे जाणार होते. मात्र मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांची मोटारसायकल कुवे खत कारखाना येथे आली असता मागाहून आलेल्या आयशर कंटेनरने क्र.(एमएच.०४.केएफ.७११६) ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. हा कंटेनर अब्दुल मोईद खान (वय ३२, रा.ठकुरापूर, जि.बलरामपुर, उत्तरप्रदेश) हा चालवित होता. या अपघातात शिवाजी भेरे हे महामार्गावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे सहा.पोलीस उपनिरीक्षक अरविंद कांबळे, पोलीस हेड.कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, वाहतूक पोलीस रहीम मुजावर, म.पो.कॉन्स्टेबल नंदा मोहीते तसेच चालक नाना डोर्लेकर, उमाजी बजागे आदीं आपल्या सहकार्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाताची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आयशर कंटेनर चालकावर भा.न्या.सं.कलम १०६(१), २८१, १२५ अ आणि ब, १८४ मोटार वाहन कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे अधिक तपास करीत आहेत.