खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील किल्लेमी येथे बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत गोठा जळून खाक झाला. या आगीत एक बैलही जखमी झाला. नगरपरिषदेच्या अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 तासानंतर आग आटोक्यात आणली. यामुळे गोठयातील 3 जनावरे बालंबाल बचावली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
किल्लेमी येथील एका शेतकऱ्याच्या गोठयाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनालक गजानन जाधव आदी तातडीने घटनास्थळी पोहाले. ग्रामस्थांच्या मदतीने जनावरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक बैल मात्र जखमी झाला. या आगीत गोठा बेचिराख झाला. लगत असलेला दुसरा गोठा वाचवण्यात अग्निशमक दलाला यश आले.