बेकायदेशीर जमाव करत कंपनीत घुसल्याची तक्रार, कामही बंद पाडल्याचा आरोप
खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत टप्प्यातील असगणी येथील कोकाकोला कंपनीत बेकायदेशीरपणे जमाव करत केलेल्या राडयाप्रकरणी शिंदे शिवसेनेच्या 14 हून अधिक पदाधिकाऱ्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
असगणी येथे कोकाकोला कंपनी उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना सामावून न घेता परप्रांतियांना स्थान दिले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त शिवसेसेनेच्या पदाधिकाऱ्यानी कंपनीत घुसून परप्रांतीय कामगारांना हुसकावून बाहेर काढत कामही बंद पाडले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यानाही धारेवर धरत स्थानिकांना सामावून घेण्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी तंबी शिवसेनेने कंपनीला दिली होती.
या राडयानंतर कंपनीचे कामकाज 3-4 दिवस बंद होते. बेकायदेशीरपणे जमाव करत कंपनीत घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार 14 हून अधिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या या राडयानंतर कंपनीतील बंद असलेले काम गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झाल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर कोकाकोला कंपनीत स्थानिक तरुणांना सामावून घेण्यासाठी शिवसेना पुन्हा कोणती आक्रमक भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कंपनीने स्थानिक तरूणांना प्राधान्य न दिल्यास पुन्हा कंपनीत घुसून कामकाज बंद पाडण्याच्या तयारीत शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे समजते.