20 फुट लांबी प्रतिकृती
गोव्यातील वॉर मेमोरीयल येथे अभ्यास प्रदर्शनासाठी ठेवणार
रत्नागिरी : युद्धनौका नेमकी कशी असते, तिच्यावर नेमकं काय काय असतं, याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र इच्छा असूनही सर्वसामान्यांना ती पाहता येत नाही. पण रत्नागिरी शहरानजीकच्या जुवे येथील सचिन चव्हाण या तरूणाने आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा ‘मोरमुगाओ’ युद्धनौकेची 20 फुट लांबी प्रतिकृती रत्नागिरीत तयार केली आहे. या प्रतिकृतीचे 3 फेब्रुवारी रोजी गोवा येथील वॉर मेमोरियल कॉलेज येथे व्हाईस ऍडमिरल यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
शहरानजीकच्या कर्ला-जुवे येथील रहिवासी असलेले सचिन चव्हाण हे नेव्हल एनसीसी डिपार्टमेंट मुंबई येथे नोकरीला आहेत. नौदलाकडूनच ‘आयएनएस मोरमुगाओ’ या युध्दनौकेची सचिन चव्हाण यांना ही प्रतिकृती बनवण्यास सांगण्यात आली होती. चव्हाण आणि टीमने रत्नागिरीतच जुवे येथे 20 फूट लांब आणि साडेसात फूट उंचीची ही प्रतिकृती तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे महिनाभर ती प्रतिकृती तयार करण्यासाठी मेहनत घेतली. चव्हाण यांनी रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथील किरण शिंदे, झरेवाडी येथील क्षितीज कळंबटे, नांदेड येथील संघर्ष नरवाडे, कणकवलीतील हर्ष पांगे, सातारा येथील हेमंत भाग्यवंत या कारागीर तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा वॉर मेमोरियल कॉलेजमध्ये ती ठेवण्यात येणार आहे. येत्या 3 फेब्रुवारीला गोवा येथे व्हाईस ऍडमीरल यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सर्वसामान्यांनाही ती पाहता येणार आहे.
‘मोर्मूगाव‘ हे गोवा किनारपट्टीवरील एक शहर आहे. या शहराला विविध नावांनी ओळखले जाते. परंतु मूळ नाव हे ‘मोर्मूगाव‘ असल्याने युद्धनौकेला तेच नाव नौदनालाच्यावतीने दिले जावे, अशी सूचना तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी केली होती. त्यानुसार ‘मोर्मूगाव‘ हे गोवामुक्ती दिनाचे महत्त्वाचे केंद्र होते. त्यामुळेच या विनाशिकेची पहिली समुद्री चाचणी ही गोवामुक्ती दिनी 19 डिसेंबर 2021 ला सुरू झाली, ही युद्धनौका ताफ्यात दाखल करून त्यावेळी घेण्यात आली.
मोरमुगाओ युध्दनौका वैशिष्टये
▪️अत्यंत अत्याधुनिक प्रकारची ‘मोर्मूगाव‘ ही विनाशिका श्रेणीतील युद्धनौका आहे.
▪️नौदलाच्या ताफ्यात या युद्धनौकेचा दोन वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला.
▪️‘कोलकाता‘ श्रेणीतील युद्धनौकेहून सरस आणि अधिक क्षमता (कुठल्याही रडारमध्ये न येणाऱ्या).
▪️युध्दनौकेवर असतो कॅप्टन अन्य 44 अधिकारी व नौसैनिकांचा चमू.
▪️‘आयएनएस विशाखापट्टणम‘सारखीच ब्रह्मोस; बराक क्षेपणास्त्र, दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, इलेक्ट्रिकल युद्धपद्धती प्रणाली, स्वदेशी रॉकेट लाँचर, समुद्री देखरेख रडार, पाणतीर डागणारी स्वदेशी प्रणाली, मध्यम पल्ल्याचे आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी प्रणाली आदी आधुनिक सामग्रींनी सज्ज.
▪️76 टक्के प्रणाली भारतीय बनावटीची अशा सर्व सामग्री सज्जतेमुळेच ‘शौर्य, पराक्रम व विजयी भव‘, ही या विनाशिकेची युद्धघोषणा आहे.
▪️‘डी 67‘ हा या युद्धनौकेचा क्रमांक असून ‘प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज‘ असे तिचे ब्रीदवाक्य आहे.