राजापूर : शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करून इमारतीचा अनधिकृत वापर थांबविण्यात आला असल्याने आमरण साखळी उपोषण थांबवावे, असे पत्र राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे गुरुवारी पाचव्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा उपोषणकर्ते अमोल सोगम व ग्रामस्थांनी केली आहे.
शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी, दि.२६ जानेवारीपासून आमरण साखळी उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर तेथील मुलांना स्थलांतरित करून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात यावा, अशी कारणे दाखवा नोटीस दारुल हबीब जनरल एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट यांना शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली. याबाबत खुलासा करावा; अन्यथा मदरसा बंद करणेबाबत कारवाई केली जाईल, असे सूचित करण्यात आले आहे.
उपोषणाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार गंबरे व प्रभारी पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी बुधवारी रात्री उशिरा उपोषण मागे घेण्याच्या विनंतीचे पत्र दिले. त्यामुळे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा सोगम यांनी केली.
याप्रसंगी अमोल सोगम, पुरुषोत्तम खांबल, दादा सोगम, संदीप सोगम, अरू मांजरेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार, कोषाध्यक्ष विवेक गुरव, महादेव गोठणकर, दादा मराठे, सूरज पेडणेकर, सुहास मराठे, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सुभाष गुरव, सुशांत मराठे, संदीप चव्हाण, महेश मयेकर, निकेश पांचाळ, विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दिलीप गोखले, नेत्रा गोखले, प्रकाश आमकर, अमोल बोळे, काशीनाथ गोरले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.