नितिश खानविलकर/पाचल:-विद्यानिकेतन शाळेच्या त्यागाच्या परंपरेमुळे प्रतिभावंत, संस्कारक्षम पिढी घडली असे उद्गार ग्रामीण समाज प्रबोधिनी संचलित विद्या निकेतन येळवणचे अध्यक्ष चंदूभाई देशपांडे यांनी काढले. ते माता भगिनी समता स्नेहमेळावा आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ.संघमित्रा फुले (गावडे) यांनी ” आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला अनुलक्षून इ अध्ययन, अध्यापन साहित्याचा वापर करून ज्ञानार्जन करणारे विद्या निकेतन येळवण हायस्कूल आहे ” असे गौरवोदगार काढले. गेली 49 वर्षे सातत्याने या मेळाव्यातून महिलांचे प्रबोधन करत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. उपस्थित महिलांना विविध आजार आणि शालेय विद्यार्थी यांना मोबाईल चे दुष्परिणाम विषद केले. याप्रसंगी मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक व धामणपे गावचे रहिवासी मधुकर गोमणे हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘दृढ निश्चय व बुद्धीचा योग्य वापर केल्यावर माणसाला आपली प्रगती करता येते, त्यासाठी मुलांवर माता पित्याचे योग्य संस्कार झाले पाहिजेत’. या शाळेत विद्यार्थ्यांवर अत्यंत चांगले संस्कार होत आहेत हे मी अनुभवले आहे.या शाळेला आवश्यक ती अन्य मदत मी नेहमीच करत राहिन असे उदगार त्यांनी काढले.
संस्थेचे कार्यवाह संभाजी केळूसकर यांनी ही शाळेने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीचे वर्णन आपल्या छोटेखानी भाषणात केले. तसेच ग्रामीण समाज प्रबोधिनी येळवण या संस्थेला आयकर विभागातून ‘आयकर मुक्तीचे प्रमाणपत्र’ मिळवल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेच्या नूतन सभागृहाला शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका कै.सौ.छाया देशपांडे स्मृती सभागृह असे नामकरण करण्यात आले. तर नुकत्याच निधन झालेल्या शाळेच्या आदर्श शिक्षिका व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा गांगण यांचे नाव एका कक्षाला देण्यात आले.
मुंबईतील TWJ या एका कंपनीच्या वतीने इ.५ वी ते १० वी विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या वकृत्व, निबंध आणि चित्रकला या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण या कंपनीची प्रतिनिधी, शाळेची माजी विद्यार्थ्यीनी व गांगण बाई यांची कन्या शर्वरी गांगण यांनी केले. याप्रसंगी रांगोळी कक्ष, इ लर्निग कक्षाचे उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बाणे यांनी केले.
या कार्यक्रमाला सीने कलावंत रोहन देशपांडे, गृप ग्रामपंचायत येळवण च्या सरपंच दिपाली जाधव, पोलिस पाटील शुभदा सकपाळ, संस्थेचे सदस्य सुधीर शिर्के आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. उपस्थितांचे आभार विद्या लोंढे यांनी मानले.