वेंगुर्ले : राजस्थान मध्ये गुन्हा करुन वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे लपलेल्या संशयितांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.
२४ जानेवारी २०२५ रोजी राजस्थान येथे शिवराज गँगमधील हन्नी बिहारी आणि त्याचे ३ साथीदार खंडणीसाठी फिर्यादी व साक्षीदार यांचा गोळया झाडून खून करण्याचा प्रयत्न करुन पळून गेले होते.
त्यापैकी संशयित करन मातादिन पारीक, दिपक सोमवीर जाट ऊर्फ लांबा, नरेंद्रसिंग गजेंद्र चौहान, (राजस्थान) यांनी गुन्हा केल्यानंतर २८ जानेवारी पासून शिरोडा येथे वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. सदर संशयितांविरुद्ध करधनी पोलीस ठाणे (जि. जयपूर, राजस्थान) येथे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, करधनी पोलीस ठाणे, जयपूर यांचेकडील प्राप्त माहितीनुसार सदर संशयित हे शिरोडा, सिंधुदुर्ग व गोवा राज्यात असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष पथके तयार करुन संशयितांचा शोध घेण्यात येत होता. त्याचदरम्यान सदर संशयित हे शिरोडा एस. टी. बस स्टँड जवळील एका राजस्थानी बेकरी व्यावसायिकाच्या बेकरी जवळ राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन सापळा रचून तिन्ही संशयितांना शिरोडा येथून ताब्यात घेण्यात आले. सदर संशयितांना आज दि. ३० जानेवारी २०२५ रोजी करधनी पोलीस ठाणे, राजस्थान पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.