दिपक गुरव खून प्रकरण 2022
राजापूर : तालुक्यातील केळवडे येथील 2022 साली झालेल्या दिपक गुरव याच्या खून प्रकरणातून दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी संजय मुगे आणि सह आरोपी विजय जाधव असे अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधिश ए. एम. अंबाळकर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. या प्रकरणी आरोपी संजय मुगे याच्यावतीने राजापुरातील ऍड. शशिकांत सुतार व ऍड. प्रविण नागरेकर यांनी काम पाहिले. तर विजय जाधव याच्यावतीने ऍड. आदेश चवंडे यांनी काम पाहिले.
तालुक्यातील केळवडे येथील मयत दिपक गुरव याने गावातील पोलीस पाटील सुनिल गुरव यांना 4 अपत्य असल्याने त्यांचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे यासाठी उपोषण केले होते. तसेच गावातील नळपाणी योजनेवरून मयत दिपक गुरव व संजय मुगे यांच्यामध्ये वाद होता. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी संजय मुगे याने दिपक गुरव याच्यावर बंदुकीची गोळी झाडून खून केल्याचा आरोप संजय मुगे याच्यावर ठेवण्यात आला होता.
दीपक गुरव 4 फेब्रुवारी 2022 रोजी या जंगल भागामध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी बंदूकीची गोळी लागुन त्यांचा मृत्यू झाला होता असे दाखवण्यात आले. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी संजय मुगे याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान दिपक गुरव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर संजय मुगे यांना काडतुसे पुरवल्या प्रकरणी इंदवटी येथील विजय जाधव याच्यावर आरोप ठेवून सहआरोपी करण्यात आले होते.
या प्रकरणी आरोपी दिपक मुगे यानंतर न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान पोलीसांनी या प्रकरणी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणी जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधिश ए. एम. अंबाळकर यांच्या समोर खटला चालविण्यात आला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे २५ साक्षिदार तपासण्यात आले. दरम्यान सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे व आरोपी तर्फे सादर करण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे विचारात घेऊन आरोपी विरूध्द गुन्हा शाबित करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने न्यायालयाने आरोपी संजय मुगे याची या गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली आहे.