अनिष्ट रूढी परंपरांना मूठमाती देऊन नटून – थटून येणाऱ्या विधवा महिलेला मिळणार साडी बक्षीस
‘आनंदाचा क्षण, शासकीय योजनांचा जागर’ उपक्रम
देवरूख : येथील चक्रभेदी फाऊंडेशनने महिलांसाठी एक अनोखा उपक्रम 2 फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. ‘आनंदाचा क्षण, शासकीय योजनांचा जागर’ या उपक्रमातून विधवा महिलाना सन्मानाने जगता यावे यासाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांत जी विधवा महिला समाजाच्या बुरसटलेल्या, अनिष्ठ प्रथाना मूठमाती देऊन नटून थटून येईल तिला साडी भेट दिली जाईल. या अनोख्या उपक्रमाचे सद्या कौतुक होत आहे.
चक्रभेदी संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत या सामाजिक जाणिवेतून आपल्या स्व – खर्चातून विधवा महिलाना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या शासकीय योजनांची माहिती देऊन महिलाना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या हळदीकुंकूचे महिलांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सर्व महिला हळदीकुंकवांच्या कार्यक्रमाला नटून थटून घराबाहेर पडून हळदीकुंकू, वाण घेण्याचा आनंद घेत आहेत. मात्र विधवा महिला या आनंदापासून लांब आहेत. या विधवा व एकल महिलांनी सुद्धा घराबाहेर पडून हळदीकुंकू, वाण या समारंभाचा आनंद घ्यावा असे त्यांना वाटते. त्यांनी नटून थटून घराबाहेर पडावे तसेच त्यांना विविध शासकीय योजनाची माहिती व्हावी यासाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशन तर्फे 2 फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४:३० वाजता पंचायत समिती देवरुख सभागृह येथे खास हळदीकुंकू, ‘वाण देऊन मान सन्मानाचा “आनंदाचा क्षण, शासकीय योजनाचा जागर” हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.. ज्यांना हळदी कुंकू घ्यायची इच्छा नाही त्यांनी केवळ भेट वस्तू घेतली तरी चालेल. सदर कार्यक्रमासाठी संस्थेला कुठूनही निधी नाही. मात्र चाक्रभेदीच्या वैदेही सावंत यांनी हा कार्यक्रम राबवला आहे.
शासनाचा जी आर आला की विधवा अनिष्ठ प्रथा बंद करण्याचा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने करावा असा त्यांचा विश्वास आहे. 2022 पासून त्यांनी हे व्रत घेतले आहे. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील ५० गावांमध्ये या संदर्भातील जाणीव जागृतीचे कार्यक्रम संस्थेने केले आहेत. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. २०२२ पासून संस्था स्वखर्चाने हे कार्यक्रम करत आहे. सर्व संवेदनशील व्यक्तींनी महिलांच्या सन्मानासाठी शक्य होईल तेवढी थोडीफार वस्तू किंवा वेळ, पैसा, कष्ट या रूपाने मदत करावी असे आवाहन वैदेही सावंत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी स्मिता पाटील, नीलिमा निकम, गौरी गोखले, सेजल मांगल्ये, रोहिणी कांबळे, राधिका यादव, राजश्री शिंदे सुनिता जोशी, शबाना खतीब (७५०७४ ३७३१४), वैदेही सावंत (९१३०२०४४४७) यांच्याशी संपर्क साधावा.