मुंबई:- नूतनीकरणामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ या वर्षी बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वृत्तानुसार, अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी टर्मिनलचा पुनर्विकास केला जाणार आहे.
त्यामुळे २०२३ मध्ये, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने उद्घाटन केलेले सीएसएमआयएचे टर्मिनल १ मोठ्या नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. टर्मिनल नूतनीकरणाचे काम याच वर्षी सुरु होणार आहे. या नूतनीकरणामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ आणि नव्याने बांधलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरलं जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-१ च्या नुतनीकरणानंतर दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्यास सक्षम होणार असल्याचे म्हटलं जातंय. पुनर्विकासानंतर त्याची क्षमता ४२ टक्क्यांनी वाढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल १ तीन वर्ष म्हणजेच २०२६ पर्यंत तात्पुरते बंद राहणार आहे. तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यमान टर्मिनलच्या आधुनिकीकरणाच्या कामाच्या समांतर एक नवीन टर्मिनल बांधण्यात येणार आहे. हे बदल तीन वर्षांत पूर्ण केले जातील.
मुंबई विमानतळाच्या सध्याच्या टर्मिनल १ मध्ये १ ए, १ बी आणि १ सी असे तीन विभाग आहेत, जे सर्व वेगवेगळ्या वर्षी बांधले गेले आहेत. टर्मिनल १ ए १९९२ मध्ये बांधण्यात आले. तर टर्मिनल १ सी २०१० मध्ये त्याला जोडण्यात आले. त्याआधी बांधलेल्या टर्मिनल १ बी मध्ये ऑगस्ट २०१७ मध्ये केलेल्या तपासणीत अनेक दोष आढळून आले. या निर्णयामुळे इंडिगो आणि एअर इंडियासारख्या प्रमुख विमान कंपन्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
नवीन टर्मिनल १ ची रचना, किंमत आणि अंतिम क्षमता यासंबंधीची माहिती समोर आलेली नाह. अदानी समूहाने प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी टर्मिनल २ आणि नवीन टर्मिनल १ ला जोडणारा भूमिगत बोगदा बांधण्याचीही योजना आखली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दरवर्षी ५.१ कोटी प्रवाशांची वाहतूक होते. टर्मिनल २ वरुन २.४ कोटी प्रवासी वाहतूक होते.