वेंगुर्ले:- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वेंगुर्ले आरवली येथे अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवर रिपोर्ट सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
दि.२८ जानेवारी रोजी रात्री ११.२८ वा. च्या सुमारास आरवली वेंगुर्ला समोर सोळा वाव पाण्यात – समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) यांनी नियमित गस्त घालत असताना कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जयशिला सुवर्णा कोटीयान, रा. कोदावूर, ता. मलपे, राज्य कर्नाटक यांची नौका हनुमा सानिध्य नों. क्र.- IND-KA-२-MM-५२१७ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडण्यात आली आहे. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. सदर नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) यांनी पोलिस कर्मचारी आळवेकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दिपेश मायबा, मिमोह जाधव व सागर परब व सागरी सुरक्षारक्षक राजेश कुबल, स्वप्नील सावजी, निलेश पाणजी, प्रणित मुणगेकर, हर्षद टाक्कर, भगवान तांडेल, चंद्रकांत कुबल यांच्या सहकार्याने सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान अहोरात्र परराज्यातील ट्रॉलर, नौका एलईडीद्वारे मोठ्या प्रमाणात अनधिकृत मासेमारी करून मत्स्य लूट केली जात आहे. याबाबत कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकरच्या मत्स्य लुटीमुळे माशांचे प्रमाण कमी झाले असून सर्वसामान्य मच्छिमार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने अशा धडक कारवाई करून, तसेच मत्स्य प्रमाण कमी झाल्याने मत्सुदुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मच्छिमारातून करण्यात आली आहे.