मंडणगड : सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणास बसलेल्या आंबडवे येथील मॉडेल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेले उपोषण अखेर तीन दिवसांनी मागे घेतले. मुंबई येथे कर्मचाऱ्याच्यावतीने गावातील जागृती मंडळाचे शिष्ठमंडळ व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालयास जमीन देणगी देणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याना विद्यापीठाने नियमानुसार सेवेत कायम न करता इतरही मागण्या प्रलंबित ठेवल्याने देणगीदार जमीन मालक सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, नीलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनित सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले होते. मात्र शिष्टमंडळाच्या मुंबई विद्यापीठाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व आश्वासनपूर्तीच्या लेखी पत्रानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.