रत्नागिरी:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रत्नागिरीत १ आणि २ फेब्रुवारीला होणार आहे.
ही बैठक शिरगाव येथील ओंकार मंगल कार्यालयात होईल, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, राधा वणजू , राहुल थोरात, अण्णा कडलास्कर यांनी दिली.
राज्य कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील सहा महिन्यांच्या विभागवार कामाचा आढावा घेऊन पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन करण्यात येईल. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विभाग, अंनिस प्रकाशन विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, महिला विभाग, आंतरजातीय विवाह सहाय्य विभाग, मानसिक आरोग्य विभाग, बुवाबाजी संघर्ष विभाग या व इतर विभागांच्या कामकाजावर चर्चा होईल.
या बैठकीसाठी राज्यभरातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी डॉ. हमीद दाभोलकर, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, प्रवीण देशमुख, गणेश चिंचोले इत्यादींसह जिल्हा पदाधिकारी आणि शाखा पदाधिकारी तसेच क्रियाशील कार्यकर्ते असे मिळून सुमारे दीडशे लोक उपस्थित राहणार आहेत.
बैठकीचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समाजवादी कार्यकर्ते आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते आणि क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत अंनिसने मागील सहा महिन्यात केलेल्या कामाचे राज्य आणि जिल्हा अहवाल सादरीकरण करण्यात येईल. रात्री ८ वाजता रत्नागिरीतील प्रसिद्ध जादूगार विनयराज यांचे जादूचे प्रयोग सादर होतील व त्यानिमित्ताने बुवाबाजी भांडाफोडबद्दल चर्चा होईल.
बैठकीचा समारोप रविवारी, २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस, रत्नागिरी शासकीय फिशरीज कॉलेजचे प्रा. डॉ. केतन चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोपप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पाच महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन रत्नागिरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनोद वायंगणकर, राधा वणजू, जयश्री बर्वे, वल्लभ वणजू, अनिश पटवर्धन, मधुसूदन तावडे करीत आहेत.