रत्नागिरी:- कला आणि संस्कृती यांनी आपला समाज नटलेला आहे. व्यावहारिक जीवनात रोज काम करत असताना स्वतःची कला जोपासणेदेखील अत्यंत आवश्यक असते. त्यात आजचा आधुनिक काळ असल्यामुळे या धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे यांनी केले.
रत्नागिरी उपकेंद्रात आयोजित नाट्यशास्त्र विभागाच्या नाट्य प्रस्तुती सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. ढगे म्हणाले की, कला माणसाला आतून जिवंत ठेवते. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कलेला वेळ देणे आवश्यक आहे. नाटक ही त्यातीलच एक कला आहे. यावेळी डॉ. ढगे यांनी उपकेंद्रातील उपस्थित नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
नाट्यशास्त्र विभागाचे अध्यापक डॉ. शशांक पाटील यांनी प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. याशिवाय नाटकातून मुलांचा कशारीतीने उत्कर्ष होतो आहे, हेदेखील सांगितले. कार्यक्रमात नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री नाट्यांश, नाटकाचे प्रकट वाचन, नृत्य आणि गायन अशा विविध कला प्रस्तुत केल्या.
नृत्यप्रशिक्षक शिवानी केळकर यांनी गणेशवंदना सादर केली. गगन सदन तेजोमय सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. शिवाय वैयक्तिक सादरीकरण नाट्यशास्त्र प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील यांनी (नट) ही भूमिका सादर केली. अद्वैत काळे (अंतू बर्वा), कामिनी महाडीक (लेकुरे उदंड झाली), सविता आंबर्डेकर (अव्यक्त), अनघा नागवेकर (कुछ बाते कुछ नसीहत), आसक्ती भोळे (कैफियत), श्रावणी महाकाळ (जखमी भारत) विठ्ठलाच्या पायी नृत्य सादरीकरण श्रावणी महाकाळ हिने केले. लल्लाटी भंडार जोगवा नृत्य आणि ऋची पाष्टे आणि श्रावणी महाकाळ यांनी कोळी नृत्य सादर केले.
यावेळी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, नाट्यशास्त्र विभागाचे प्रशिक्षक डॉ. शशांक पाटील, रत्नागिरी उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक देशभक्तीपर गीताने झाली.