कुडाळ : चिपी-मुंबई विमानसेवा आधीच बंद पडलेली आहे,आता चिपी-पुणे ही विमान सेवा सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे; सद्यस्थितीत थोडे दिवस थांबा, विमानतळाला टाळे ठोकू नका अशी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही गप्प आहोत,पण नजीकच्या काळात आम्ही चिपी विमानतळाला टाळे ठोकणार हे निश्चित असल्याचा पुनरुच्चार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
कुडाळ येथे आंदोलना दरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.यावेळी वैभव नाईक म्हणाले की, चिपी-मुबंई सेवा बंद आहे; याबाबत माध्यमांच्या वतीने आम्ही आवाज उठवला होता. परंतु या ठिकाणच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी आमची भूमिका समजावून न घेता आमच्या विरोधात भूमिका घेत आमच्या घराला टाळा ठोकण्याचा इशारा दिला. चिपी-पुणे विमानसेवा सुरू आहे, परंतु शनिवारीच हवामानातील बदलामुळे ते विमान अचानक रद्द करण्यात आले.परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी तर प्रवाशांची यापेक्षाही मोठी गैरसोय झाली.
पुण्यावरून चिपीसाठी येणारे विमान अचानकपणे गोवा येथे लँडिंग करण्याची नामुष्की विमान प्रशासनावर आली. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर या विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे रात्री सोडाच चिपी विमानतळावर दिवसाही विमान उतरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लाईट सुविधा पुरवा अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली असल्याचे नाईक यांनी सांगितले.