पाचल /अंकुश पोटले:-एस टी भाडेवाडीच्या विरोधात आज राज्यात ठिकठिकाणी जनता जनार्दन रस्त्यावर उतरले आहेत, एसटीची 14.95% भाडे वाढ झालेली आहे, एकीकडे मोफत प्रवासाची योजना व दुसरीकडे प्रचंड भाडेवाढ ! सरकारचे धोरण सर्व सामान्य लोकांच्या समजण्या पलीकडेचे आहे. एसटी सेवा सक्षम होऊ नये म्हणून आजवर अनेक प्रयत्न झाले, देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खाजगी वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत बळकट करण्याचे प्रयत्न झालेले आहेत पण आपल्याकडे गरिबांची मर्सिडीज अशी ओळख असणारे एसटीची सेवा डळमळीत झालेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे, एसटीची सेवा गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे मिळू नये म्हणून राजकीय नेते, खाजगी सेवा देणारे ठेकेदार यांच्यात असणारी मिली भगत युती काही लपून राहिलेली नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे, सरकारने भाडेवाढ करून सार्वजनिक वाहतूक सेवेला अत्यंत डबघाईला आणले आहे.
“गाव तेथे एसटी व रस्ता तिथे एसटी” हे उद्दिष्ट केव्हाच मोडीत निघाले आहे, सरकारने अशा या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे, एकीकडे खाजगी बसेसचा सुळसुळाट तर दुसरीकडे महामंडळाचा अनागोंदी कारभार यामुळे एसटी सेवेचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे, गावोगावी काही ठिकाणी जीप, टेम्पो, टमटम या धावू लागल्या आहेत हे सर्व एसटी सेवेच्या मुळावर येऊन बसले आहे कारण ही सेवा लोकांना थेट घरापर्यंत पोहोचवत असल्यामुळे लोक या सेवेला पसंती देऊ लागले आहेत, नवे परिवहन मंत्री पंचवीस हजार एसटी गाड्या खरेदी करणार आहेत, एवढ्या घाईघाईने ही मोठी खरेदी का होत आहे ? एसटीची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे,कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही,दिवसेंदिवस प्रवासी संख्या कमी होत आहे, त्यामुळे या नवीन गाड्यांच्या कर्जाचे हप्ते कोण भरणार ? हा प्रश्न निर्माण होतो ? सरकारकडे याचे उत्तर नाही, नवीन मंत्र्यांनी सर्वप्रथम एसटी सेवा सुधारावी,प्रवासी संख्या वाढवणे या कडे लक्ष द्यावे, बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,अशा स्तरावरती काम केले तरच ही लाल परी पुन्हा रस्त्यावर दिमाखात वेगाने धाऊ लागेल !