रत्नागिरी: कोकणी माणूस व नाटक यांचा जवळचा संबंध आहे. अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. विविध आजार व आजारांबद्दल समज, गैरसमज व त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी भव्य आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा आयोजित केले, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी काढले.
विविध आजार व आजारांबद्दल समज व गैरसमज व त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन २०२५ निमित्त भव्य आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली.
या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, आय. एम. अध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. अलिमिया परकार आदी उपस्थित होते.
न्यायाधीश श्री. गोसावी म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी डॉ. भास्कर जगताप यांनी आरोग्य विभागाने पुढाकार घेवून अशा पध्दतीने जनजागृती करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी हा स्तुत्य कार्यक्रम असून असे उपक्रम निरंतर व्हावे असे सांगितले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ यांनी उद्दिष्ट व नियोजनबाबत प्रस्तावना केली. या नाट्य स्पर्धेकरिता डॉ. परकार डॉ. ढगे डॉ. विकास कुमरे हे परीक्षक म्हणून लाभले. विविध महाविद्यालये, जिल्हा शासकिय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा १६ संघानी आरोग्य जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट सादरीकरण केले.
या नाट्यस्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय यांनी पटकविला, विजेत्या संघाला प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ८ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक यश फांउडेशन नर्सिंग कॉलेज यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ५ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक पटवर्धन कॉलेज यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ३ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिरसाठ, सचिन पाटिल, सतीश कांबळे, सचिन भरणे, रामेश्वर म्हेत्रे, राम चिंचोले आदीनी परिश्रम घेतले.