दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी
रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत येथील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले.
आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करते. याच मराठी भाषेतील शिक्षणाने उच्च पदापर्यंत पोहोचवले, असे मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केले. दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. दामले विद्यालयाचे काम आदर्शवत असल्याचेही त्या म्हणाल्या.
श्री. पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला.
विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार म्हणाले.
आभार मुख्याध्यापक श्री. मोटे यांनी मानले .