२४ कोटी ७२ लाख रुपये खर्चाचा, सुमारे १०० वर्षं आयुर्मान असलेला पुतळा १० एप्रिलपर्यंत उभारण्यात येणार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येत असून तो ६० फूट उंच असणार आहे. सुमारे २४ कोटी ७२ लाख रुपये खर्चाचा, सुमारे १०० वर्षं आयुर्मान असलेला पुतळा येत्या सहा महिन्यांत १० एप्रिलपर्यंत उभारण्यात येणार आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी अनावरण झाल्यावर अवघ्या आठ महिन्यांनंतर २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते. तसेच पुतळा बांधकाम सल्लागार व शिल्पकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितांना अटकही झाली. दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय २५ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आला. आता एस एस ३१६ दर्जाचे स्टेनलेस स्टील वापरून आरसीसी चबुतरा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच स्टेनलेस स्टीलचे फ्रेमवर्क वापरून कांस्य धातूचा पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा पुतळा उभारण्याची जबाबदारी प्रसिद्ध शिल्पकार श्री राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन कंपनीला देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा ६० फूट उंच असेल. पुतळ्यासाठी कांस्य धातूचा वापर करताना संपूर्णपणे गंजरोधक स्टेनलेस स्टीलमध्ये सपोर्ट फ्रेमवर्क असेल. ३ मीटर उंचीचा आरसीसी चबुतरा, गंजरोधक स्टेनलेस स्टील वापर केला जात आहे. या पुतळ्याची रचना किमान १०० वर्षे आयुर्मान असेल अशी करण्यात येत आहे. तसेच पुतळा उभारण्यात आल्यानंतर या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती कंत्राटदारामार्फत १० वर्षे केली जाणार आहे.
मालवण राजकोट किल्ल्यावर सदरचे काम संबंधित ठेकेदार यांच्याकडून सुरू करण्यात आले आहे. जुन्या पुतळ्याचा चबुतरा पूर्णपणे पाडून झाला असून सद्यस्थितीत नवीन चबुतराचे आरसीसी काम प्रगतीत आहे. ठेकेदाराने चबुतरा उभारण्याचे काम प्रगतीपथावर ठेवले असून सद्यस्थितीत पुतळा बनवण्याचे कामदेखील राम सुतार आर्ट क्रिएशन यांच्या कार्यशाळेत सुरू आहे. संपूर्णपणे पुतळ्याचे थर्मोकोलमधील मॉडेल तयार झाले असून वीस फूटपर्यंत पुतळ्याचे ब्राँझमधील काम पूर्ण झाले आहे. सावंतवाडी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी या कामावर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्या मते हे काम सहा महिन्यांत म्हणजेच १० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होईल. या निविदेमध्ये तशी अटही घालण्यात आली आहे. हे काम ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाले आहे.
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक राजकोट किल्ल्यावर हा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभा राहणार आहे. नौदलदिनी उभारण्यात आलेला पुतळा पाहण्यासाठी अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रीघ लागली होती. तो पुतळा कोसळेपर्यंत जवळपास पाच लाख पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती मालवणमधील जाणकारांनी दिली.
राजकोट किल्ल्यावर वेगाने काम सुरू, कार्यकारी अभियंता श्री महेंद्र किणी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यास महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निविदा २४ कोटी ७२ लाख रुपये (जीएसटीसह) स्वीकारली असून सहा महिन्यांत १० एप्रिल २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पुतळा आणि चबुतरा बांधणीचे काम वेगाने सुरू आहे.