कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आदेश
दापोली:-दापोली तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत अडखळचे सरपंच रवींद्र घाग यांना पदावरून हटविण्याचा टाकण्याचा आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहेत. यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे.
याबाबत उपसरपंच रउफ काझी व अन्य चार सदस्य यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. गावातील अकबर काझी यांनी सरपंच रवींद्र घाग यांच्याकडे वाळूसाठा करण्याकरिता रॉयल्टी भरण्यासाठी दाखला मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. ग्रामपंचायत विभागातील शासन परिपत्रकानुसार महसूल व वनविभाग व कृषी परवानगी व बांधकामास मान्यता घेण्याकरिता गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग स्थापन करत असेल किंवा कार्य किंवा सध्या असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्यात येत असेल तेव्हा असे उद्योग उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही नमूद करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीकडून द्यायचे ना हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने ग्राम सचिवाच्या स्वाक्षरीने देणे गरजेचे असते. असे असतानाही सरपंच रवींद्र घाग यांनी अकबर काझी यांना मासिक सभेची मान्यता न घेता स्वत:च्या स्वाक्षरीने दाखला दिल्याचे निदर्शनात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. सदर वस्तूस्थिती लक्षात घेता रवींद्र घाग यांनी शासन परिपत्रक तरतुदीचे उल्लंघन केले आहे, यामुळे रवींद्र घाग यांनी याप्रकरणी प्रशासकीय अनियमितता केली असून आर्थिक अनियमितता केलेली दिसून येत असल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
रवींद्र घाग हे दापोली तालुक्यातील एका राजकीय पक्षाचे वजनदार नेते आहेत. शिवाय ते एका समाजाचे प्रतिनिधित्व देखील करतात. यामुळे त्यांच्या गच्छंतीने तालुक्यात खळबळ उडाली आहे.