चोरलेल्या दोन दुचाकी जप्त
राजापूर:-जुलै 2024 मध्ये राजापूर शहरातील बाजारपेठेतून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. दिलीप गंगाराम बेंद्रे (कोंडये-बेंद्रेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याजवळ चोरी केलेल्या दोन दुचाकी सापडल्या आहेत.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी रात्री 7 च्या सुमारास राजापूर शहरालगतच्या कोंढेतड गाडगीळवाडी येथील अरविंद लांजेकर यांची दुचाकी 8 जुलै 2024 रोजी सायंकाळी राजापूर बाजारपेठेतून चोरीला गेली होती. दरम्यान कोंडये येथे कामानिमित्त गेलेल्या लांजेकर यांच्या व्यापारी मित्राला लांजेकर यांची दुचाकी कोंडये बेंद्रेवाडीतील दिलीप बेंद्रे यांच्या घरासमोर उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ लांजेकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लांजेकर यांनी राजापूर पोलीस ठाणेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख सहकाऱ्यासमवेत कोंडये बेंद्रेवाडी येथे दाखल झाले आणि दुचाकीसमवेत दिलीप बेंद्रेला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत आपण दुचाकी चोरल्याची कबुली दिलीपने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी दिलीप याच्याकडे आणखी एक चोरीची दुचाकी सापडली. ही दुचाकी त्याने एप्रिल 2024 मध्ये राजापूर एसटी डेपो येथून चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दिलीप बेंद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तिवरेकर करत आहेत.