खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्याचा प्रजासत्ताकदिना मुहूर्त हुकला आहे. भोगाव पुलावरील गर्डर, ‘क्युरिंग’च्या कामामुळे मार्गात ‘स्पीडब्रेकर’ निर्माण झाला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही बोगद्यातील अंतर्गत कामांसह दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरनाची कामेही पूर्ण झाली आहेत. एक-दोन दिवसात दुसऱ्या बोगद्यात 10 पंखे बसवण्यात येतील. ‘ट्रायल’नंतर दुसरा बोगदाही पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
सद्यस्थितीत एका बोगद्यातून वाहतूक सुरू असली तरी दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामामुळे 22 सप्टेंबरपासून बंद झालेली वाहतूक आजमितीसही ठप्पच आहे. दुसऱ्या बोगद्यात विद्युतीकरणासह पंखे व इतर अंतर्गत कामांमुळे वाहतुकीला ‘ब्रेक’ लावावा लागला. दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी प्रजासत्ताकदिना मुहूर्त निश्चित करण्यात आला होता.
प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर दुसऱ्या बोगद्यातूनही वेगवान प्रवासी ‘डेडलाईन’ अखेर हुकली आहे. बोगद्यातील विद्युतीकरणची कामे पूर्ण झाली आहे. बोगद्यापासून काही अंतरावर उभारलेल्या पुलावर स्लॅब देखील टाकण्यात आला आहे. एक-दोन दिवसात बोगद्यात 10 पंखे बसवण्याचे काम देखील पूर्ण होईल. क्युरिंगच्या कामासाठी आणखी 10 ते 12 दिवसांचा अवधी लागणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले. यामुळे प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर सुरू होणारा सुस्साट प्रवासाचा मुहूर्त हुकल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. ‘ट्रायल’नंतरा दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.
दोन्ही बोगद्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने 300 मीटरवर 6 क्रॉस पॅसेजी उभारणी करण्यात आली आहे. याद्वारे बोगद्यात अपघात घडल्यानंतर वाहतूक तातडीने दुसऱ्या बाजुने वळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा टळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठयासाठी सद्यस्थितीत डी.जी.व्यवस्था करण्यात आली आहे. बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठयासाठी महावितरणकडे 11 के.व्ही. क्षमतेच्या वीजपुरवठयाची मागणी करण्यात आली आहे. यासाठी 80 लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरणा केल्यानंतर महावितरणकडून 11 के.व्ही. क्षमता वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
दोन्ही बोगद्यात वाहतूक नियंत्रणासह वाहनालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. पहिली 4 वर्षे देखभाल दुरूस्तीसह सुरक्षा रक्षकाची जबाबदारी ठेकेदार निभावणार आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग खाते पुढील जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले. कशेडीतील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होताहेत कधी, या प्रवाशांना आतुरता लागली आहे.
कशेडीतील दुसऱ्या बोगद्याचा प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकला!
