▪️ढोल ताशांच्या गजरात श्रीशिवशंभुंचा जयघोष करण्यासाठी कसबा नगरी सज्ज
संगमेश्वर / प्रतिनिधी :- माघ शु. सप्तमी म्हणजेच दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी संभाजी महाराजांचा ३४४ वा राज्याभिषेक दिन आहे. अशा या पावन मुहूर्तावर हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज, दुसरे छ्त्रपती श्री संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा श्रीक्षेत्र कसबा-संगमेश्वर ठिकाणी साजरा होणार आहे.
कसबा म्हणजे धर्मनगरी, त्रिनदी संगमावरील ज्या संगमेश्वर देवस्थनामुळे या स्थानाला संगमेश्वर ही ओळख प्राप्त झाली, त्याच कसब्यामध्ये शंभूराजे बहुत काळ वास्तव्य केले. इथेच शंभुराजे बेसावध असताना घात करुन त्यांना पकडले. खऱ्या अर्थाने श्रीशंभूछत्रपतींच्या बलिदानाची सुरुवात झाली ती इथेच, या भूमीत. श्री क्षेत्र वढू-तुळापूर प्रमाणेच संभाजी महाराजांच्या जीवनपटलावरील आणि इतिहासाच्या कालपटावरील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे ठिकाण, जिथे स्वतः श्री शंभू छत्रपतींनी रुद्राप्रमाणे, श्रीपरशूरामा प्रमाणे अनेक धर्मकृत्य केली, ते ठिकाण म्हणजे कसबा.
याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वैचारिक पाऊल खुणांवर चालणारी पिढी समाजात घडावी, या एकमेव उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे नित्यपुजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी च्या प्रयत्नातून निरंतर सुरू आहे. ४ फेब्रुवारी रोजी भव्य अशा राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व श्रीशिवशंभूपाईकांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड यांनी केले आहे.
कसबा येथे श्री शंभुराज्याभिषेक सोहळा रंगणार
