तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील वाटूळ येथून 21 जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह माण्याचे कोंड येथे गवतात आढळून आला. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र चव्हाण (36, वाटूळ कडेकरवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा 21 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता घरातून निघून गेला होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो सायंकाळी घरी न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला, नातेवाईकांकडे शोध घेतला असता सापडून आला नाही. त्यानंतर 23 जानेवारी रोजी राजापूर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मोबिन मुनीर शेख करत होते. बेपत्ताचा शोध घेत असताना 25 जानेवारी रोजी मिलिंद चव्हाण यांना ज्ञानेश्वरचा मृतदेह माण्याचे कोंड येथे गवतात दिसून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिस आणि नातेवाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तो मृतदेह ज्ञानेश्वर याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास मोबिन शेख करत आहेत.
राजापूर वाटूळ येथील बेपत्ता 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
