◾ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य
◾ पंचरंगी कवायतीचे सादरीकरण
संगमेश्वर / प्रतिनिधी :- शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला – क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते . अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून येते . ग्रामीण भागातील विद्यार्थी शरीराने काटक असतात . अशा विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊ शकतात . विद्यार्थ्यांमधील खेळाचे असे वेगळे गुण हेरण्याचे काम पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या क्रिडा विभागाने केले असून यातूनच प्रजासत्ताक दिनी प्रशालेतील मुलींनी सादर केलेले बहारदार लेझीम नृत्य आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली पंचरंगी कवायत पाहून उपस्थित पाहुणे मंडळी भारावून गेली .संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या लेझीम नृत्य आणि पंचरंगी कवायतीचे भरभरून कौतूक केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून उपस्थित संस्था पदाधिकारी आणि पाहुणे मंडळींसमोर प्रशालेतील मुलींनी पारंपारिक वेशात लेझीम नृत्याचे विविध प्रकार सादर केले. याबरोबरच प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेली पंचरंगी कवायत पाहून उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली . प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी लेझीम नृत्य आणि पंचरंगी कवायतीसाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढोर्लेकर यांनी केले.
प्रारंभी संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी उत्तम संचलनाने उपस्थितांना मानवंदना दिली . प्रशालेतील विद्यार्थींनींनी देशभक्तीपर गीत सादर केले . यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सह सचिव अनिल शिंदे , संदीप सुर्वे , रमेश झगडे , जितेंद्र प्रसादे, समीर शेरे , बाबा नारकर , अप्पा कुष्टे, खान, म्हालदार, दिनेश आंब्रे, किशोर पटेल, गोविंद भिडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते . संगमेश्वर बाजारपेठेतून लेझीम नृत्याच्या साथीने सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्यानंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळी : प्रजासत्ताक दिनानिमित्त लेझीम नृत्य सादर करताना प्रशालेच्या विद्यार्थिनी ( छाया – मिनार झगडे, संगमेश्वर )