गाडीच्या काचा फोडल्या
चिपळूण : सावर्डे केदारनाथ कॉलनी येथे पूर्ववैमनस्यातून मारहाण, जातीवाचक शिवीगाळसह गाडी तोडफोड केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण तसेच ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीष राजाराम कोकाटे, अजित राजाराम कोकाटे (दोघे-सावर्डे बाजारपेठ), अशोक गंगाराम काजरोळकर (सावर्डे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत उद्योजक गिरीष कोकाटे व महावितरण अधिकारी अशोक काजरोळकर यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.
अशोक काजरोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काजरोळकर यांनी 8 महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे गिरीष कोकाटे यांच्याविरुध्द जी. एस. टी. कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर 21 जानेवारी रोजी कोल्हापूर जी.एस.टी कार्यालयाने कोकाटे यांच्या दुकानात धाड टाकली होती. हा राग मनात धरुन काजरोळकर यांच्या घराच्या ठिकाणी 24 रोजी रात्री 10 वाजता गिरीष व अजित कोकाटे हे हातात लोखंडी शिग घेऊन आले. यावेळी त्यांनी मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही मारहाण सोडवण्यासाठी काजरोळकर यांची पत्नी व मुलगा आले असता त्यांनाही त्या दोघानी ढकलून दिले. या मारहाणीनंतर काजरोळकर यांच्या मालकीच्या कारची गिरीष व अजित यानी तोडफोड केली. मारहाणीत काजरोळकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गिरीष व अजित कोकाटे याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गिरीष कोकाटे यांनी देखील परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानी दिलेल्या फिर्यादीत अशोक काजरोळकर यांनी आपल्याला लोखंडी सळईने मारहाण केल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे काजरोळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड करीत आहेत.
सावर्डे येथे पूर्ववैमनस्यातून मारहाण; परस्परविरोधी फिर्याद, तिघांवर गुन्हा
