सम प्रमाणात वाढ झाल्याने गुगल पे, फोन पे च्या जमान्यात सुट्टे 2 रुपये आणायचे कुठून
मुंबई : एसटी महामंडळाने शनिवार मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे. एसटीची भाडेवाढ करताना ती पाचच्या पटीत करायला हवी होती. परंतू ही भाडेवाढ सम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टे पैसे देताना अडचण होत आहे. नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर कंडक्टर आणि प्रवाशांत वाद होत आहेत. त्यामुळे ही भाडे वाढ एसटी प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद करणारी ठरली आहे.
एसटी महामंडळाने भाडेवाढ करताना ती विषम संख्येत केलेली आहे. नव्या तिकीट दरानुसार आता फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ या पटीत विषम संख्येत झाले आहे. तर हाफ तिकीट देखील ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१,५६ असे विषम संख्येत झाले आहे. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतू नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना एक रुपया अतिरिक्त बाळगावा लागणार आहे. प्रवाशांनी १०,१५,२५,५० रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करावा लागणार आहे. अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला ताप होणार आहे.
तर सुट्ट्या पैशांवरुन तंटे होणार नाहीत
दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी एसटी महामंडळाच्या भाड्यात सम प्रमाणाच्या पटीत भाडेवाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना सुट्टे पैसे देताना कंडक्टर आणि प्रवाशांत काही वाद झाले नाहीत. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८ ( २) तरतुदी नुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे १४.९५ टक्के इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला होता. पण त्याला मंजुरी देताना सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा बैठक घेऊन दुरुस्ती करण्यात यावी आणि सम प्रमाणात भाडेवाढ करावी, तरच वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरुन कोणतेही तंटे होणार नाहीत असे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी आणि वाहकात होणार भांडणे, हाफ तिकीट दर ‘एवढा’ तर फुल……
