चिपळूण (प्रतिनिधी):– शहरानजीकच्या कापसाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतारीत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून लवकरच या विश्रामगृहाचे रुपडे पालटणार आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच लोकप्रतिनिधी यांना सुसज्ज शासकीय विश्रामगृह पाहायला मिळणार आहे.
शासकीय विश्रामगृह म्हणजे शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासाठी निवासस्थान! याचबरोबर मंत्री महोदयांच्या विश्रामगृहात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक देखील होतात. या दृष्टीने चिपळूणमध्ये शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले आहे. मात्र, या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली होती. यामुळे या विश्रामगृहाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. सदरील काम मुंबई येथील आर्क सुनील इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीने घेतले आहे.
या शासकीय विश्रामगृहात पूर्वी तळमजल्यात वरील मजल्यात प्रत्येकी सहा खोल्या होत्या. मात्र आता यामध्ये बदल करून तळमजल्यात दोन बेडचे एक रूम तर दुसरा एक बेडचे एक रूम तर वरील मजल्यावर ४ रूम आहेत. यामध्ये एका बाजूला मास्टर बेड, अँटी चेंबर लिविंग हॉल तर दुसऱ्या बाजूला सूट रुम, लिविंग रूम वेटिंग हॉल तसेच शेड उभारली जाणार असून लॉन व सीटिंग अरेंज केली जाणार आहे. डायनिंग हॉल एकंदरीत सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह केले जाणार आहे. तर आवारात गार्डन उभारले जाणार असून मुंबई- गोवा महामार्गावरील हे शासकीय विश्रामगृह सर्वांचे लक्ष वेधेल यात शंका नाही.
शासकीय विश्रामगृहाचे रुपडे पालटण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता व शाखा अभियंता ठेकेदार कंपनीच्या कामावर लक्ष ठेवून आहे. तर ठेकेदार कंपनीने देखील मुंबई- गोवा महामार्गावरील असलेले शासकीय विश्रामगृह सुसज्ज होण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.