चिपळूण, (प्रतिनिधी)ः रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकाच्या पुरूष व महिला गटाच्या क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील अडरे येथील मैदानावर पार पडल्या. पुरूष गटात चिपळूण तालुक्याने संगमेश्वर संघावर मात करित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर महिला ग्रामसेवक गटात संगमेश्वर तालुक्यातून लांजा तालुक्याच्या पराभव करित विजेतेपद पटकावले. दोन्ही विजेत्या संघाना पारितोषीक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तालुक्यातील अडरे येथे १८ ते १९ जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या क्रिकेट स्पर्धा झाल्या.
ग्रामसेवकांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, खेळातून ताण तणाव कमी व्हावा. या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरूष गटात पहिली उपांच्या फेरीचा सामना चिपळूण व रत्नागिरी तालुक्यात झाला. या गटात जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये चिपळूण तालुक्याने विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर दुसरा उपांच्या सामना संगमेश्वर व खेड तालुक्यात झाला. यामध्ये संगमेश्वर संघाने चमकदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेतील अंतिम सामनाही चुरशीचा होण्याची शक्यता होती. चिपळूण तालुक्याने प्रथम फलंदाजी करताना ५ ओव्हरमध्ये ५९ धावांचे आव्हान संगमेश्वर तालुक्यास दिले. त्यानुसार विजयी धावसंख्येचा पाठलाग करताना संगमेश्वर तालुक्याची दमछाक झाली. संगमेश्वरचा संघ ३३ धावांमध्ये गारद झाल्याने चिपळूण संघाने विजेतेपद पटकावले. परिणामी संगमेश्वरला उपविजेतेपदतर खेड तालुक्यास कृतीय क्रमांक मिळाला.
महिला गटात ६ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. महिलांमधील अंतिम सामना संगमेश्वर विरूद्ध लांजा तालुक्यात झाला. संगमेश्वर मधील खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत विजेतपदाला गवसणी घातली. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत सर्व ग्रामसेवकांनी क्रिकेटचा खिलाडूवृत्तीने आनंद घेतला.
संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना पारितोषीक देऊन गौरवण्यात आले. चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनीही हजेरी लावून ग्रामसेकांना प्रोत्साहन दिले. दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांनी पारितेषीक देखील दिले.
स्पर्धेच्या यशतेश्वीसाठी चिपळूण तालुका सरपंच संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारीणीतील सदस्य व सर्व सभासदांनी मेहनत घेतली.
गेल्या चार वर्षापासून जिल्ह्या ग्रामसेवक संघटनेच्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमध्ये सुरवातीस सलग दोन वर्षे चिपळूण तालुक्याने विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या वर्षी दापोली तालुक्याने बाजी मारली होती. यंदा चौथ्या वर्षी पुन्हा चिपळूण तालुक्याने विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेदरम्यान सलग चार वर्षे चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव असलेल्या रोहिदास हांगे यांनी कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.