ठाकरे शिवसेनेत खळबळ
चिपळूण : गेली 40 वर्षे उबाठा शिवसेनेत विविध पदावर सक्रीय असणारे माजी जिल्हाप्रमुख व विद्यमान सह संपर्कप्रमुख सचिन कदम यांनी आपल्या पदाचा व सक्रीय सदस्यत्त्वाचा तडकाफडकी राजीनामा शुक्रवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. कदम यांच्या राजीनाम्याने ठाकरे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
कदम हे गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेत आहेत. मध्यंतरी शिवसेना फुटीनंतरही ते पक्षप्रमुख ठाकरे यांच्याबरोबर राहीले. पक्षातील प्रदीर्घ वाटचालीत शिवसैनिकापासून सुरूवात करताना विभागप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख ते अगदी सहसंपर्कप्रमुखपदापर्यत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी पक्षप्रमुख ठाकरे यांया नावे पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी आपला राजीनामा देण्यामागे व्यक्तिगत कारण दिलेले आहे. सध्यस्थितीत माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे पक्षाच्या कामासाठी वेळ देता येत नसल्याने पदासह सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असून तो मंजूर करावा असे नमुद केले आहे.
कदम यांचे चिपळुणसह उत्तर रत्नागिरीत वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पदाच्या राजीनाम्यासह पक्षातील सक्रीय सदस्यत्वाही राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे खरंच व्यक्तिगत कारण आहे की अन्य काही आहे याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.