चिपळुणात हिंदू जनजागृती समितीची मागणी
बांगलादेशी जामीन राहणारा मालेगाव येथील असल्याने त्याचीही चौकशी करा
चिपळूण:-जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोर मोठया प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यापैकी काहीजण कोणत्याही कागदपत्राशिवाय तर काही बनावट कागदपत्रासह वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोर शोधमोहीम तीव्र करून त्यांना व मदत करणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले की, चिपळूण येथे ऑक्टोबर 2023 मध्ये दहशतवाद विरोधी शाखा-रत्नागिरी यांनी बुलू हुसैन मुल्ला या बांग्लादेशी नागरिकाला त्याच्या 2 मुलांसह अटक केली होती. मात्र त्याच्या परिवारातील इतरांना अटक केली नाही. गेली 12 वर्षे त्याची पत्नी आणि आणखी काही मुलांना घेऊन तो चिपळूण येथे राहत आहे. पोलिसांनी या प्रकरणी नीट तपास केला नसल्याने बुलू मुला व त्याच्या 2 मुलांना जामीन मिळाला. देशात घुसखोरी करणाऱ्याला जामीन मिळतो, हे अतिशय गंभीर असून जामीनदार मालेगाव येथील मोलमजुरी करणारा आहे, तो जामीन कसा राहिला, त्याचा बांगलादेशी नागरीकाशी काय संबंध, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथील चीरेखाणीवर अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या 13 बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. ते कागदपत्रां शिवाय भारतात प्रवेश करून चिरेखाणीवर काम करत होते.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बांग्लादेशी महिला मागील 8 वर्षांपासून वास्तव्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेचे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केले असून विवाह ही केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्या महिलेच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोर शोधमोहीम राबवावी. बांग्लादेशी घुसखोरांना बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी. भाडयाने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवण्यापूर्वी त्या कामगारांची योग्य ती चौकशी करावी, घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे सहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही नमूद केले आहे. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी, भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद भुरण, युवा सेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, गोरक्षक विक्रम जोशी, अभिनव भुरण, हिंदू राष्ट्र समन्वय समिती सयेजक अमित जोशी, शिवसेना गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर उपस्थित होते.