चिपळूण:- काही दिवसापूर्वी तालुक्यातील पिंपळी-तीनवड येथे घरफोडी प्रकरणातील दोन मुख्यसूत्रधारांना चिपळूण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोल्हापूर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. यामध्ये एका स्थानिक तरुणाचा समावेश असून त्या दोघाना न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवन जयंत आंबेडे (28, वालोटी-चिपळूण), ज्ञानेश्वर कृष्णात पाटील (23, कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तालुक्यातील पिंपळी-तीनवड येथे 2 जानेवारी रोजी एका घराची कौले काढून चोरटयानी रोख रक्कमेसह दागिने असा 1 लाख 88 हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीप्रकरणाचा तपास सुरु असताना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण प्रथकाला काही महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. त्याआधारावर चोरीतील मुख्यसूत्रापर्यंत पोहोचचण्यासाठी तांत्रिक बाबीच्या आधार घेण्यात आला. यात पवन आंबेडे, ज्ञानेश्वर पाटील हे मुख्यसूत्रधार असल्याचे पुढे येताच या पथकाने त्याचा शोध सुरु केला. अखेर ते कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळताच या पथकाने उपविभागिय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदीचे पथक कोल्हापूर येथे रवाना झाले होते.
अथक परिश्रमाअंती पवन आंबेडे, ज्ञानेश्वर पाटील या दोघाना ताब्यात घेत अटक करण्यात आली. या चोरी प्रकरणाचा तपास कर्नाटक राज्यापर्यंत करण्यात आला आहे. त्या दोघाना चिपळूण न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील पवन आंबेडे हा स्थानिक तरुण आहे. गुन्हे प्रकटीकरण प्रथकाच्या कामगिरीबद्दल कौतुक होते आहे.