मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले जाहीर
रत्नागिरी:-तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात केली. मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव करण्यासाठी सव्वा कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे ‘पुस्तकांचे गाव‘ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासियांचे अनेक वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
वाचन चळवळीला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांना राज्य शासनाकडून चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुस्तकांचे गाव हा एक त्यातील उपक्रम होता. यासाठी कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक आणि विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुस्तकांच्या गावांसाठी केशवसुतांच्या मालगुंडचा प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर मार्च 2021 मध्ये भाषा विकास मंत्रालयाची एक समिती मालगुंडला आली होती. त्यावेळी केशवसुत स्मारकांमध्ये कोमसाप पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. प्राथमिक चाचपणीत ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्याकडूनही हिरवा कंदील मिळाला होता.
प्रत्यक्ष भेटीवेळी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यानी मालगुंड गावांमध्ये किती ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल ठेवता येथील याची पाहणी केली. यामध्ये गावातील शाळा, ग्रामस्थांची घरे, हॉटेल्स यासह केशवसुत स्मारक ग्रंथालयाचा समावेश होता. या संबंधित ठिकाणी ग्रंथालयाप्रमाणे रचना केली जाणार आहे. पुस्तक ठेवण्यासाठी 2 मोठे स्टॅण्ड, बसण्यासाठी खुर्ची टेबल ठेवण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणी प्रवेशद्वारावर पुस्तकांचे गाव म्हणून पाटीही लावली जाणार आहे. आवडीची पुस्तके वाचण्याबरोबरच त्याच्या विक्रीचीही व्यवस्था केली जाणार आहे. यात कादंबरी, कथा, कवितांचे दालन, चरित्रग्रंथ यासह वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने वाचन संस्कृतीला चालना मिळणार असून पर्यटनवाढीलाही मदत होऊ शकते. गणपतीपुळेत दरवर्षी मोठया प्रमाणात पर्यटक येतात. त्यातील वाचन संस्कृतीशी निगडित पर्यटक मालगुंड येथे वळू शकतो. निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.