ग्रामपंचायतीत एसी बसवणे पडले महागात!
चिपळूण:-सावर्डे ग्रामपंचायतमधील दालनात वातानुकूलित यंत्रणा बसवल्याबद्दल तत्कालिन ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबर चुकीचा ठराव करणाऱ्या ग्रामपांचायतीलाही नोटीस दिली जाणार आहे. अशोक काजरोळकर यांच्या तक्रारीनुसार पंचायत समिती स्तरावरून ही कारवाई केली जात आहे.
मुळातच शासनाने सरकारी अधिकारी यांना वातानुकूलित यंत्रणा कोणत्या ग्रेडच्या अधिकाऱ्याना वापरता येईल, याचे परिपत्रक काढले आहे. अशातच सावर्डे ग्रामपांयतीतील ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या दालनात विनापरवाना वातानुकूलित यंत्रणा बसवली. या यंत्रणेचा खर्च व त्याचे वीजबिल हे सामान्य जनतेच्या करातून जाणार असल्याने या विरोधात काजरोळकर यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणेची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारीनंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एस. कांबळे यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानी दिलेल्या अहवालात तत्कालिन ग्रामविकास अधिकारी पोवार यांनी बेकायदेशीरपणे वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचे स्पष्ट केले आहे. पोवार यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी कार्यवाही करण्यात येणार आल्याचे गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी तक्रारदार काजरोळकर यांना कळवले आहे.
ग्रामपंचायतीलाही नोटीस देणार
सावर्डे ग्रामपंचायतिचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी के. डी. पवार यांनी आपल्या अधिकाराचा नियमबाह्य वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. त्याबरोबर ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीलाही नोटीस दिली जाणार आहे, असे चिपळूण पंचायत समिती गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी सांगितले.